कर्करोगाविषयी शंका समाधान करणारी ४४ प्रश्नोत्तरे
कर्करोग म्हणजे काय?
मानवी शरीरातील निरोगी, साधारण पेशी असाधारण पेशींमध्ये रूपांतरित होऊन त्यांचे अनिर्बंध पेशीविभाजन होण्यामुळे अनेक प्रकारच्या गाठी तयार होऊ शकतात. अनिर्बंध विभाजित होणाऱ्या कर्कपेशी आजूबाजूच्या निरोगी पेशींना मारून झपाट्याने आसपास पसरू शकतात. या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या गाठींना एकत्रितपणे कर्करोग असं संबोधलं जातं. बर्याच प्रकारच्या कर्करोगाच्या गाठींमध्ये मूळ ठिकाणाहून शरीरात इतरत्र पसरण्याची क्षमता असू शकते. या प्रक्रियेला कर्करोग संक्रमण (cancer metastasis) म्हणतात. अनारोग्याशी संबंधित जागतिक मृत्यू दराचा विचार करता कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा घातक रोग-समूह आहे. पण कर्करोग निदान आणि उपचार पद्धती या दोन्हींमध्ये गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे कर्करोगातून रुग्ण बरे होऊन निरामय आयुष्याकडे परतण्याचे प्रमाण वाढून मृत्यु दरात घट झालेली आहे.
कर्करोगाची लक्षणे कोणती?
शरीराचा कोणता भाग व्याधीग्रस्त आहे त्यानुसार कर्करोगाची लक्षणे निरनिराळी असतात, आणि ती अभ्यासता येतात. कर्करोगाशी संबंधित अशी, पण जी फक्त कर्करोगाशीच निगडित असतील असे नव्हे, अशी काही चिन्हे व लक्षणे आपण बघूयात.
- थकवा
- त्वचेखाली जाणवणारी गाठ किंवा सूज
- वजनात अनपेक्षितपणे होणारे बदल
- त्वचेच्या रंगात दिसणारे काही बदल उदाहरणार्थ त्वचा पिवळी पडणे, काळवंडणे किंवा लालसर दिसणे
- दीर्घकाळ बरे न होणारे व्रण, अचानक बदलत जाणारे तीळ किंवा मस
- मूत्रविसर्जन किंवा मलविसर्जनाच्या सवयीत घडून आलेले बदल
- दीर्घकाळ टिकणारा कफ आणि खोकला किंवा श्वासोच्छ्वासास होणारा त्रास
- अन्न गिळताना होणारा त्रास
- घोगरेपणा
- दीर्घकाळ टिकणारे अपचन किंवा जेवणानंतर येणारी अस्वस्थता
- स्थायी स्वरूपाचे स्नायू दु:ख आणि सांधेदुखी
- दीर्घकाळ टिकून राहणारा ताप किंवा दीर्घकाळ रात्री घाम येणे
- अनपेक्षित रक्तस्त्राव किंवा जखम
वर दिलेल्या लक्षणांपैकी कोणतीही दीर्घकाळ टिकून राहिली तर काळजी करत बसण्यापेक्षा लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना भेटून सल्ला घ्यावा. आणि यापैकी कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी देखील जर तुमच्या मनात काही काळजी किंवा शंका असेल तरी तुमच्या वयानुरूप, आणि स्त्री किंवा पुरुष असण्यानुसार कर्करोगविषयक पूर्वपरीक्षणे किंवा चाचण्या कोणत्या आहेत त्यांची माहिती मिळवायलाही हरकत नाही.
कर्करोगाची कारणे कोणती?
पेशींमधील डीएनए द्रव्यातील रचना बदलांमुळे (म्युटेशन मुळे) कर्करोग होतो. हे डीएनए हजारो वेगवेगळ्या जनुकांमध्ये रचलेले असते. जनुकांमध्ये पेशीला कोणती कार्ये करावीत, तसेच वाढ आणि विभाजन कसे करावे हे सांगणाऱ्या रासायनिक सूचनांचा संच असतो. या सूचनांमधील त्रुटींमुळे पेशींचे सामान्य कार्य थांबू शकते आणि कर्करोगी पेशी निर्माण होऊ शकते.
जनुकांपासून निर्माण होणाऱ्या प्रथिनांमध्ये रचनात्मक किंवा संख्यात्मक बदल घडतात, किंवा पेशी विभाजनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी प्रथिने निर्माणच होत नाहीत. असे हे जनुकांच्या आज्ञावलीच्या क्रमवारीतील बदल विकीरणांमुळे, घातक रसायनांमुळे किंवा विविध विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे घडू शकतात. असे जनुकीय बदल झालेल्या पेशी सुरुवातीस म्हंटल्याप्रमाणे मुळात निरोगी आणि साधारण असल्या तरी त्यांचे असाधारण पेशींमध्ये रूपांतर होते, आणि त्यांचे अनिर्बंध पेशीविभाजन होण्यामुळे कर्करोगाच्या गाठीची निर्मिती होते.
आता सर्वच जनुकीय बदल कर्करोगाची निर्मिती करतात का? तर तसे होत नाही. मानवी शरीरात एक अतिशय कार्यक्षम अशी यंत्रणा असते की ज्याद्वारे जनुकीय बदल लवकरात लवकर दुरुस्त केले जातात. या यंत्रणेला जनुकीय दुरुस्ती यंत्रणा असे म्हणता येईल. याद्वारे बहुतांश बदल पूर्ववत केले जातात. पण जर ही यंत्रणा कार्यान्वित करणारे जनुकच बिघडले तर दुरुस्ती होण्याचे कार्य मंदावते किंवा थांबते. अशा परिस्थितीत जनुकीय बदल दुरूस्त न केले जाता पेशी विभाजन अनिर्बंध होण्याची शक्यता वाढते.
जनुकांच्या आज्ञावलीच्या क्रमवारीतील बदल फक्त विकीरणांमुळे, घातक रसायनांमुळे किंवा विविध विषाणूंच्या प्रादुर्भावामुळेच होतात असे नाही तर काही (अत्यंत कमी प्रमाणातील) रुग्णांमध्ये असे जनुकीय बदल अनुवांशिकतेमुळेही येऊ शकतात.
कर्करोगाची शक्यता वाढवणाऱ्या जनुकातील बदल अनुवांशिकतेने मिळाल्यास त्या व्यक्तीस कर्करोग होईलच असे आहे का?
आई-वडिलांकडून सदोष जनुके मिळाली म्हणजे अपत्यांमध्ये कर्करोग होईलच असे नाही. अशा सदोष जनुकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते हे खरे असले तरी देखील यानंतर रसायने, विकीरणे वा विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे कर्करोगाच्या सुरूवात होण्यासाठी इतर अधिक बदल घडवून येणे हे आवश्यक असते. म्हणजेच कर्करोग निर्मिती ही केवळ एका पायरीने सुरू होणारी घटना नसून त्यासाठी अनेक जनुकीय बदल घडून येणे बरेचदा आवश्यक असते.
कर्करोगाची शक्यता वाढवणारे घटक कोणते आहेत?
कर्करोगाची व्याधी सुरू होण्याची काही कारणे वैद्यकीय संशोधकांना आता कळाली आहेत. पण कर्करोगाची शक्यता ज्यांमुळे बळावते अशा अद्यापही अज्ञात असलेल्या इतर काही कारणीभूत तत्त्वांविषयी संशोधन सतत चालू आहे. आज ज्ञात असलेल्या काही तत्त्वांकडे आपण आधी पाहूयात. यांत समावेश होतो तो व्यक्तीच्या वयाचा, स्त्री वा पुरुष असण्याचा, सवयींचा आणि जीवनशैलीचा, कौटुंबिक इतिहासाचा, आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्याधींचा, आणि त्या व्यक्तीच्या सभोवतालाचा.
तुमचे वय:कर्करोगाची निर्मिती होण्यासाठी कित्येक वर्षे जावी लागतात. म्हणूनच कर्करोग साधारणपणे ६५ वर्षे वयावरील वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. पण याचा अर्थ सर्वच कर्करोग वृद्ध व्यक्तींमध्येच होतात असे अजिबात नाही. तरुणांमध्ये, तसेच अगदी बालकांपासून किशोरवयीन मुलांमध्येही, काही कर्करोग आढळतात. त्यामुळे या व्याधीला वयाचे निश्चित असे बंधन नाही.
स्त्री वा पुरुष असा लैंगिक फरक:मुळात पुरुष आणि स्त्रिया यांच्या शरीरात अनुक्रमे प्रॉस्टेट ग्रंथी आणि गर्भाशय /अंडाशय असे लिंग-विशिष्ट अवयव असल्यामुळे त्या अवयवांना कर्करोग होण्याची शक्यता साहजिकच अधिक असते. पण त्या व्यतिरिक्त देखील स्त्री-पुरूषांत इस्ट्रोजेन व टेस्टेस्टेरोन सारख्या वेगवेगळ्या हॉर्मोन्सच्या स्त्रावांमुळे जनुकीय आणि रेण्वीय वैविध्य असते. त्यांमुळे केवळ त्यांच्या शरीर-रचनेत किंवा स्वभावातच बदल असतात असे नव्हे, तर नैसर्गिक रीत्या किंवा मानवी वापरामुळे ज्या रसायनांशी, विकिरणांशी किंवा विषाणूंशी त्यांचा संपर्क येतो, त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादावर देखील या वैविध्याचा परिणाम घडतो.
अशा वैविध्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये प्रामुख्याने आढळणारे कर्करोग देखील वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, जठर, यकृत आणि मूत्राशय या अवयवांचे कर्करोग, तसेच रक्ताचा कर्करोग या व्याधी प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळतात. तर स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे कर्करोग असतात स्तन आणि थायरॉईड ग्रंथीचे. यांशिवाय स्त्री-पुरुषांमध्ये दोघांमध्येही प्रकर्षाने आढळणारे कर्करोग फुफ्फुस आणि मोठे आतडे यांचे असतात.
सवयी आणि जीवनशैली:काही विशिष्ट जीवनशैलींच्या अंगीकाराने कर्करोगाची शक्यता वाढते हे प्रदीर्घ संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. धूम्रपान, अतिरेकी मद्यप्राशन, अवाजवी सूर्यस्नान, स्थूलता, असुरक्षित संभोग या अशा काही कर्करोगाच्या दृष्टीने घातक सवयी आहेत. या जीवनशैली सोडण्याने तसेच या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणण्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी करता येते. अर्थात काही व्यसने सोडणे हे सहज शक्य असत नाही, त्यामुळे मनोनिग्रहाची आवश्यकता जाणून घेऊन हे अवघड असले तरी शक्य करता येते.
अनुवांशिकता:याआधी म्हटल्याप्रमाणे कर्करोगांपैकी नगण्य प्रमाणातील कर्करोग अनुवांशिक असू शकतात. कुटुंबातील सलग पिढ्यांमध्ये कर्करोगाची उदाहरणे असतील तर जैविक परीक्षण करून घेण्याने अनुवांशिकतेचे निदान करता येते. अशा परीक्षणाद्वारे एखादा कर्करोगाशी निगडित म्हणून ज्ञात असलेला जनुकीय बदल (mutation) ओळखता येतो. केवळ असा जनुकीय बदल एखाद्या व्यक्तीत आहे असे आढळले म्हणजे कर्करोग होण्याची खात्री झाली किंवा मृत्यूघंटा वाजली असे अजिबात नाही! वर सांगितल्याप्रमाणे अशा सदोष जनुकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढत असली तरी कर्करोगाची सुरूवात होण्यासाठी इतर अधिक बदल घडवून येणे हे आवश्यक असते, कारण कर्करोग निर्मिती ही एक-पायरी घटना नसून बहु-पायरी बदल आहे (multi-step event as opposed to a single step one). म्हणून अशा व्यक्तीने कर्करोगाच्या प्रादुर्भावाच्या लक्षणांकडे डोळसपणे लक्ष ठेवणे आणि नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हे महत्त्वाचे आहे. स्तनांच्या कर्करोगाच्या बाबतीत असे जनुकीय संशोधन दीर्घकाळ चालू आहे. BRCA1 आणि BRCA2 या दोन जनुकांमध्ये झालेले बदल जर अनुवांशिकतेने एखाद्या स्त्रीमध्ये आले तर त्या स्त्रीमध्ये स्तनांचा तसेच अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.
तुमचा सभोवताल:तुमच्या आसपास असणाऱ्या घातक रसायनांमुळे तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता बळावू शकते. उदाहरणार्थ तुम्ही जरी स्वतः धुम्रपान करत नसाल तरी देखील एखादी धूम्रपान करणारी व्यक्ती सतत तुमच्या आसपास धूम्रपान करत असेल, तर या परहस्त-धूम्रपानाने (second-hand smoke / passive smoking) तुम्हालाही तंबाखूशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता बळावते. तसेच तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी वापरात असलेली अभ्रक (ॲसबेस्टॉस/asbestos) किंवा बेंझीन (benzene) सारख्या घातक रसायनांशी पुन:पुन्हा आलेला संपर्कदेखील कर्करोगाची शक्यता वाढवतो. अधिक माहितीसाठी जागतिक कर्करोग संशोधन संघटनेने तयार केलेली संपूर्ण यादी उपलब्ध आहे. (IARC Monographs on the identification of carcinogenic hazards to humans.
शारीरिक व्याधी:काही निवडक पण मोजक्याच इतर शारीरिक व्याधींमुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते. उदाहरणार्थ, मोठ्या आतड्यात सूज येऊन व्रण निर्माण होणे (आंत्र-व्रण, ulcerative colitis) व्याधीमुळे मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता थोडीशी बळावते. आणि जस-जसे या व्याधीचे वय वाढत जाते तस-तशी कर्करोगाची शक्यता देखील वाढत जाते. दहा वर्षे या व्याधीचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाची शक्यता दोन टक्के असते तर ३० वर्षे या व्याधीसह आयुष्य काढणाऱ्या रुग्णांमध्ये ही शक्यता १८ टक्के इतकी वाढते. म्हणून ही व्याधी असणाऱ्या रुग्णांनी वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. रजोनिवृत्ती होऊन गेलेल्या स्त्रियांमध्ये जर अंडाशयातील निरुपद्रवी गाठ (सिस्ट, cyst) तयार झाली तर क्वचित त्यापासून अंडाशयाच्या कर्करोगाची निर्मिती होऊ शकते. म्हणून अशा रुग्णांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे योग्य आहे. Fibroadenoma प्रकारच्या स्तनातील गाठी बहुतांशी तरुण स्त्रियांमध्ये दिसून येतात, आणि या गाठींमुळे कर्करोगाची शक्यता वाढत नाही. पण यातील complex fibroadenoma प्रकारच्या गाठी जर अनुवांशिक कर्करोगाचा इतिहास असलेल्या स्त्रियांमध्ये आढळल्या तर त्यापैकी २० टक्के स्त्रियांमध्ये पुढील २५ वर्षांत स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणून अशा रुग्णांनी वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आणि नियमितपणे स्तन-परीक्षण करून घेणे योग्य आहे.
कर्करोग रोखायचा कसा?
धूम्रपान थांबवा! आणि धूम्रपान करीत नसाल तर सुरू करूच नका! धूम्रपानाशी निगडित बरेच कर्करोग आहेत. केवळ फुफ्फुसांचाच नव्हे तर स्वर यंत्राचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा, घशाचा, मूत्राशयाचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, जठराचा, स्वादुपिंडाचा, आतड्यांचा, मलाशयाचा, गर्भाशयाच्या मुखाचा तसेच रक्ताचा देखील कर्करोग तंबाखूच्या सेवनाशी निगडित आहे. धूम्रपान आजच थांबवल्याने तुम्ही भविष्यात होऊ शकणाऱ्या कर्करोगाची शक्यता कमी कराल.
सूर्यस्नान नको!अवाजवी सूर्य-स्नान किंवा दीर्घकाळ उन्हात राहणं थांबवा! सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेच्या कर्करोगाची शक्यता वाढते. म्हणून दीर्घकाळ उन्हात राहणे टाळावे, आणि उन्हात जाणे अपरिहार्य असेल तर संरक्षक कपड्यांचा वापर करावा, तसेच सनस्क्रीन सारखे अतिनील किरणांचा दुष्परिणाम कमी करणारे उपलब्ध उपाय वापरावेत.
निरोगी आहार घ्या.फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार निवडा. संपूर्ण धान्य आणि प्रथिने निवडा. ऑलिव्ह, शेंगदाणे आणि कॅनोला सारखी असंतृप्त तेले चांगली असतात. एवोकॅडो, बदाम, हेझलनट आणि पेकान सारखा सुका मेवा आणि भोपळा आणि तीळ यांसारख्या बिया तुमच्या आहाराचा भाग असाव्यात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही गोमांस, चीज आणि आईस्क्रीम सारख्या प्राण्यांपासून बनवलेल्या उत्पादनांमधून मिळणारे संतृप्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे, नारळ, नारळ तेल, पाम तेल आणि पाम कर्नल तेल यांसारख्या वनस्पतीपासून बनवलेल्या उत्पादनांचा अतिवापर कमी करा.
व्यायाम:कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी आठवड्यातून बहुतेक दिवस नियमितपणे व्यायाम करावा. साधारणतः दररोज निदान अर्धा तास व्यायाम होणे आवश्यक आहे.
वजनावर नियंत्रण:अतिरेकी स्थूलता असल्याने देखील कर्करोगाची शक्यता वाढते हे लक्षात घेऊन वजनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठीच सुयोग्य आहार आणि व्यायाम या दोन्हीचा समतोल राखला पाहिजे.
मर्यादित मद्यप्राशन:मद्यप्राशन करणारच असाल तर ते मर्यादितच असावे. कोणत्याही वयाच्या स्त्रीने तसेच ६५ वर्षांवरील पुरूषांनी दिवसाला एकच प्याला, आणि ६५ वर्षे वयापेक्षा कमी असलेल्या पुरुषांनी दिवसात अधिकाधिक दोन प्याले ही मर्यादा सांभाळणे हे कर्करोगाची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मद्यप्राशनाच्या अतिरेकामुळे स्वर यंत्राचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा, घशाचा, यकृताचा, आतड्यांचा आणि मलाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते हे सिद्ध झाले आहे.
कर्करोगविषयक पूर्वपरीक्षणे किंवा चाचण्या :अशा परीक्षा किंवा चाचण्या कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती पुढे येईलच. भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये त्यांची उपलब्धता आहे. म्हणून आपले वय, आजार, अनुवांशिकता इत्यादि माहितीचा विचार करून आपल्या डॉक्टरांशी ह्या परीक्षांविषयी नक्की चर्चा करावी.
लसीकरण:विशिष्ट विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे कर्करोगाची शक्यता वाढते असं संशोधनाअंती लक्षात आलं आहे. अशा विषाणूंमध्ये समावेश आहे हेपॅटायटिस बी व सी विषाणू (Hepatitis B Virus / HBV; Hepatitis C Virus /HCV), कापोसी सार्कोमा विषाणू (Kaposi Sarcoma-Associated Herpesvirus / KSHV), मर्केल पेशी पॉलिओमा विषाणू (Merkel Cell Polyomavirus /MCV), मानवी पॉलिओमा विषाणू (Human Papillomavirus /HPV), मानवी प्रतिकारन्यूनता विषाणू (Human Immunodeficiency Virus Type 1 /HIV-1, or HIV), मानवी T पेशी लिंफोट्रॉपिक विषाणू (Human T-Cell Lymphotropic Virus Type 1 /HTLV-1) आणि एपस्टीन-बार विषाणू (Epstein-Barr Virus /EBV).
यापैकी HBV आणि HPV विषाणूंच्या विरुद्ध प्रतिरोधक कार्य करणाऱ्या लसी सध्या उपलब्ध आहेत, त्यांच्या लसीकरणामुळे अनुक्रमे यकृत आणि गर्भाशयाच्या कर्करोगांची शक्यता कमी करता येते असे प्राथमिक संशोधनात आढळून आले आहे.
कर्करोग कशामुळे होत नाही?
गैरसमज:: अँटीपर्स्पिरंट्स किंवा डिओडोरंट्समुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
तथ्य: आहारातील साखर आणि कर्करोग यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी दीर्घकाळ संशोधन सुरू आहे. कर्करोगाच्या पेशींसह शरीरातील सर्व पेशी उर्जेसाठी रक्तातील साखर (ग्लुकोज) वर अवलंबून असतात. परंतु कर्करोगाच्या पेशींना जास्त साखर दिल्याने त्यांची वाढ जलद होत नाही. त्याचप्रमाणे, कर्करोगाच्या पेशींना साखरेपासून वंचित ठेवल्याने त्यांची वाढ हळूहळू होत नाही. असे काही पुरावे आहेत की मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने अन्ननलिकेचा कर्करोगासह काही विशिष्ट कर्करोगांचा धोका वाढतो. अप्रत्यक्षपणे, जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह देखील होऊ शकतो, ज्यामुळे काही कर्करोगांचा धोका वाढू शकतो. साखरेचा मध्यम वापर शहाणपणाचा आहे.
गैरसमज:: कर्करोग असलेल्या लोकांनी साखर खाऊ नये, कारण त्यामुळे कर्करोग जलद वाढू शकतो.
तथ्य: आहारातील साखर आणि कर्करोग यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी दीर्घकाळ संशोधन सुरू आहे. कर्करोगाच्या पेशींसह शरीरातील सर्व पेशी उर्जेसाठी रक्तातील साखर (ग्लुकोज) वर अवलंबून असतात. परंतु कर्करोगाच्या पेशींना जास्त साखर दिल्याने त्यांची वाढ जलद होत नाही. त्याचप्रमाणे, कर्करोगाच्या पेशींना साखरेपासून वंचित ठेवल्याने त्यांची वाढ हळूहळू होत नाही. असे काही पुरावे आहेत की मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने अन्ननलिकेचा कर्करोगासह काही विशिष्ट कर्करोगांचा धोका वाढतो. अप्रत्यक्षपणे, जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह देखील होऊ शकतो, ज्यामुळे काही कर्करोगांचा धोका वाढू शकतो. साखरेचा मध्यम वापर शहाणपणाचा आहे.
गैरसमज:: कर्करोग हा संसर्गजन्य आहे.
तथ्य: कर्करोग असलेल्या व्यक्तीला टाळण्याची गरज नाही कारण कर्करोग हा संसर्गजन्य नाही. खरं तर, कर्करोग असलेल्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे केवळ योग्यच नाही, तर तुमचा मौल्यवान पाठिंबा आणि सकारात्मक दृष्टिकोन कर्करोगग्रस्तांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. जरी कर्करोग संसर्गजन्य नसला तरी, कधीकधी संसर्गजन्य विषाणू कर्करोगाच्या विकासास कारणीभूत ठरू शकतात. कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या विषाणूंची उदाहरणे म्हणजे: मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV, एक लैंगिक संक्रमित रोगजनक विषाणू जो गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि इतर कर्करोगांना कारणीभूत ठरू शकतो), हेपॅटायटीस B किंवा C विषाणू (HBV किंवा HCV, लैंगिक संभोग किंवा संक्रमित IV सुयांच्या वापराद्वारे प्रसारित होतो, ज्यामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो). या विषाणूंपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी लसी उपलब्ध आहेत.
गैरसमज:: प्लास्टिकच्या कंटेनर आणि रॅपमध्ये मायक्रोवेव्ह केलेल्या अन्नाद्वारे हानिकारक, कर्करोग निर्माण करणारे पदार्थ बाहेर पडतात..
तथ्य: मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित म्हणून लेबल केलेले प्लास्टिक कंटेनर आणि रॅप्स धोका निर्माण करत नाहीत. असे काही पुरावे आहेत की मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरण्यासाठी नसलेले प्लास्टिक कंटेनर वितळू शकतात आणि संभाव्यतः तुमच्या अन्नात रसायने मिसळू शकतात. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरण्यासाठी मंजूर नसलेले प्लास्टिक कंटेनर मायक्रोवेव्ह करणे टाळा. संशोधन पुराव्यांवरून असे दिसून येते की प्लास्टिक उद्योगात सामान्यतः वापरले जाणारे रासायनिक बिस्फेनॉल ए (बीपीए), तसेच बीपीएचा पर्याय असलेले बिस्फेनॉल एस (बीपीएस) हे दोन्ही स्तनाच्या कर्करोगाची आक्रमकता वाढवू शकतात. हे सर्व पुरावे पाहता, बीपीए/बीपीएस असलेले प्लास्टिक टाळणे सुरक्षित आहे. म्हणून मायक्रोवेव्ह-सुरक्षित कंटेनर बीपीए-मुक्त आणि बीपीएस-मुक्त म्हणून चिन्हांकित केले पाहिजेत.
कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?
मानवी कर्करोगाच्या विविध प्रकारांमध्ये कार्सिनोमा (एपिथेलियल पेशींचे कर्करोग), सार्कोमा (स्नायू, हाडे आणि कार्टिलेज सारख्या संयोजी ऊतींचे कर्करोग), लिम्फोमा, ल्युकेमिया (रक्ताचे कर्करोग), मध्यवर्ती मज्जासंस्था (सीएनएस) ऊतींचे ट्यूमर आणि मेलॅनोमा (त्वचेचा कर्करोग) यांचा समावेश आहे.
कर्करोग पूर्वतपासणी म्हणजे काय?
कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्याने तो बरा होण्याची उत्तम संधी मिळते. म्हणून तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्करोग तपासणी योग्य असू शकते याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्क्रीनिंग चाचण्यांद्वारे काही कर्करोगांचे (उदाहरणार्थ स्तन, कोलोरेक्टल, प्रोस्टेट, तोंडाचा कर्करोग इ.) लवकर निदान झाल्यास जीव वाचू शकतात. अनुवांशिक स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या इतर कर्करोगांसाठी स्क्रीनिंग चाचण्यांची फक्त वाढत्या जोखीम असलेल्या लोकांसाठीच शिफारस केली जाते.
कर्करोगाचे निदान कसे केले जाते?
कर्करोगाचे निदान करण्यासाठी तुमचे डॉक्टर शारीरिक तपासणी, प्रयोगशाळेतील चाचण्या, इमेजिंग, बायोप्सी, रेण्वीय निदान यांपैकी एक किंवा अधिक पद्धती वापरू शकतात:
शारीरिक तपासणी:तुमचे डॉक्टर तुमच्या शरीराच्या काही भागातील गाठींमध्ये संभाव्य कर्करोग ओळखू शकतात. शारीरिक तपासणी दरम्यान ते त्वचेच्या रंगात बदल किंवा एखाद्या अवयवाच्या भागाची अकारण सूज यांसारख्या असामान्य लक्षणांवरून कर्करोगाची उपस्थिती ओळखू शकतात.
प्रयोगशाळेतील चाचण्या:मूत्र आणि रक्त चाचण्यांसारख्या प्रयोगशाळेतील चाचण्या तुमच्या डॉक्टरांना कर्करोगामुळे होणाऱ्या असामान्यता ओळखण्यास मदत करू शकतात.
इमेजिंग चाचण्या:भौतिकशास्त्रावर आधारित विविध यांत्रिक इमेजिंग प्रणालींचा वापर करून, परंतु दूरवरून, शरीराला प्रत्यक्षात स्पर्श न करता, डॉक्टर शरीराच्या आतील भागाच्या रचनेतील बदल ओळखू शकतात. अशा निदानात्मक इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये एक्स-रे, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI), अल्ट्रासाऊंड इमेजिंग किंवा अल्ट्रासोनोग्राफी (USG), संगणकीकृत अक्षीय टोमोग्राफी स्कॅन (CAT किंवा CT स्कॅन), पॉझिट्रॉन उत्सर्जन टोमोग्राफी (PET स्कॅन) इत्यादींचा समावेश आहे. या वैद्यकीय इमेजिंग पद्धतींनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, ज्यामुळे शरीरातील अवयव आणि हाडांमधील बदलांचे निदान करणे सोपे झाले आहे.
अस्थिमज्जा (बोन मॅरो) बायोप्सी:अस्थिमज्जा हा तुमच्या मांडीचे हाड आणि कंबरेच्या हाडासारख्या मोठ्या हाडांमध्ये स्पंज-सदृश पदार्थ असतो, जिथे रक्तपेशी तयार होतात. अस्थिमज्जेच्या नमुन्याचे विश्लेषण केल्याने तुमच्या रक्ताची पेशीय रचना बदलली आहे का हे कळू शकते. अस्थिमज्जा बायोप्सीमुळे थॅलेसेमिया, हिमोफिलिया यासारख्या विविध प्रकारच्या कर्करोग नसलेल्या, तसेच ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारख्या कर्करोगी रक्त विकारांचे निदान होऊ शकते. अस्थिमज्जा बायोप्सीमुळे शरीरात इतरत्र सुरू झालेले परंतु अस्थिमज्जेपर्यंत पोहोचलेले कर्करोग देखील लक्षात येतात.
एंडोस्कोपिक बायोप्सी:एंडोस्कोपी दरम्यान तुमचे डॉक्टर तुमच्या शरीरातील संशयास्पद भागातील रचना पाहण्यासाठी एक पातळ, लवचिक नळी (एंडोस्कोप) वापरतात ज्याच्या टोकावर प्रकाश असतो. नळीतून सूक्ष्म चिमट्यांसारखी विशेष साधने सरकवली जातात ज्यांद्वारे विश्लेषणासाठी ऊतींचा एक छोटासा नमुना घेतला जातो. एंडोस्कोपिक बायोप्सीमध्ये वापरल्या जाणाऱ्या नळ्या तुमच्या तोंडातून, गुदाशयातून, मूत्रमार्गातून किंवा तुमच्या त्वचेतील एका लहान चीरेतून शरीरात घातल्या जाऊ शकतात. एंडोस्कोपिक बायोप्सी प्रक्रियेच्या उदाहरणांमध्ये तुमच्या मूत्राशयाच्या आतून ऊती गोळा करण्यासाठी सिस्टोस्कोपी, तुमच्या फुफ्फुसातून ऊती काढण्यासाठी ब्रोन्कोस्कोपी आणि तुमच्या कोलनमधून ऊती गोळा करण्यासाठी कोलोनोस्कोपी यांचा समावेश आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या एंडोस्कोपिक बायोप्सी करता यावर अवलंबून, प्रक्रियेपूर्वी तुम्हाला शामक किंवा भूल देणारी औषधे दिली जाऊ शकतात.
सुईद्वारे (नीडल) बायोप्सी:नीडल बायोप्सी दरम्यान, तुमचे डॉक्टर संशयास्पद भागातून पेशी काढण्यासाठी एक विशेष सुई वापरतात. नीडल बायोप्सी बहुतेक वेळा अशा ट्यूमरवर वापरली जाते जी गाठ तुमच्या डॉक्टरांना तुमच्या त्वचेवरून जाणवू शकते, उदाहरणार्थ स्तनातील संशयास्पद गाठी आणि वाढलेले लिम्फ नोड्स.
एक्स-रे सारख्या इमेजिंग प्रक्रियेसह एकत्रित केली तर त्वचेतून जाणवू शकत नाही अशा खोलवर बसलेल्या संशयास्पद भागातून पेशी गोळा करण्यासाठीही नीडल बायोप्सी वापरली जाऊ शकते. इमेज-गाइडेड बायोप्सीमुळे यकृत, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट ग्रंथी यांतील खोलवर बसलेल्या संशयास्पद भागात प्रवेश मिळतो. वेदना कमी करण्यासाठी बायोप्सी केल्या जाणाऱ्या भागाला बधिर करण्यासाठी तुम्हाला स्थानिक भूल दिली जाते.
त्वचेची बायोप्सी:त्वचेची बायोप्सी तुमच्या शरीराच्या पृष्ठभागावरून पेशी काढून घेते, ज्या सामान्यतः मेलेनोमा आणि इतर त्वचेच्या कर्करोगांचे निदान करण्यासाठी वापरल्या जातात.
सर्जिकल बायोप्सीजर इतर बायोप्सी प्रक्रियेद्वारे संशयास्पद ऊतींपर्यंत पोहोचता येत नसेल किंवा इतर बायोप्सीचे निकाल अनिर्णीत असतील, तर सर्जन संशयास्पद पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी त्वचेला छेद घेऊन बायोप्सी करू शकतात.
बायोप्सी प्रक्रियेद्वारे काय निकाल अपेक्षित आहे?
बायोप्सीनंतर ऊतींचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. नमुन्याचे हिस्टोकेमिस्ट्री प्रक्रियेद्वारे सूक्ष्म ऊतींचे विश्लेषण केले जाऊ शकते जिथे सामान्य तपमानावर पातळ काप घेतलेल्या किंवा गोठवून कठीण केलेल्या ऊतींचे अतिशय पातळ काप रंग द्रव्ये किंवा अँटीबॉडीजने वापराने रंगविण्याची प्रक्रिया करतात. काचेच्या स्लाईडवर ठेवलेल्या या कापांचा नंतर सूक्ष्मदर्शकाखाली पॅथॉलॉजिस्टद्वारे अभ्यास केला जातो. या परीक्षेत पेशी कर्करोगाच्या आहेत की नाहीत हे निर्धारित करण्यास मदत होते. कर्करोग असल्यास, कर्करोगाचा प्रकार समजून घेण्यासाठी बायोप्सीच्या निकालांचे अधिक विश्लेषण केले जाते.
कर्करोगाच्या विविध श्रेणी कोणत्या आहेत?
बायोप्सी परीक्षा तुमच्या डॉक्टरांना कर्करोगाची श्रेणी किंवा त्याच्या वाढीची व्याप्ती समजून घेऊन तुमचा कर्करोग किती आक्रमक आहे हे ठरवण्यास मदत करते. श्रेणी बहुतेकदा 1 ते 4 च्या प्रमाणात दर्शविली जाते आणि सूक्ष्मदर्शकाखाली कर्करोगाच्या पेशी किती बदललेल्या दिसतात यावरून ती निश्चित केली जाते. कमी श्रेणीचे (ग्रेड 1) कर्करोग हे सामान्यतः सर्वात कमी आक्रमक असतात आणि उच्च श्रेणीचे (ग्रेड 4) कर्करोग हे सर्वात आक्रमक असतात. उपचार पर्याय आणि बरा होण्याची शक्यता (पूर्वनिदान) ठरवण्यासाठी ऑन्कोलॉजिस्टला मार्गदर्शन करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.
कर्करोगाचे विविध टप्पे कोणते आहेत?
पॅथॉलॉजिस्टने केलेल्या (पॅथॉलॉजिकल) मूल्यांकनाव्यतिरिक्त, हाडांचे स्कॅन किंवा एक्स-रे सारख्या इमेजिंग चाचण्या देखील कर्करोगाची आक्रमकता निश्चित करण्यात मदत करू शकतात आणि कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे का हे शोधण्यास मदत करू शकतात. कर्करोगाचे टप्पे सामान्यतः रोमन अंक I ते IV द्वारे दर्शविले जातात. अंक जितका जास्त असेल तितका कर्करोग अधिक प्रगत असतो.
कर्करोगासाठी विविध रक्त चाचण्या कोणत्या आहेत?
रक्ताच्या कर्करोगाचा अपवाद वगळता, रक्त चाचण्यांमधून तुम्हाला कर्करोग आहे की कर्करोग नसलेला इतर काही आजार आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणूनच, तुमच्या डॉक्टरांनी कर्करोगाशी संबंधित रक्त तपासणी करण्याची सूचना दिली आहे म्हणून कर्करोगाचे निदान झाले आहे आणि तुम्हाला कर्करोग झाला आहे असा गैरसमज तुम्ही करू नये. डॉक्टर कशाचा शोध घेत आहेत हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला. रक्ताच्या नमुन्यांमध्ये कर्करोगाच्या पेशी, प्रथिने किंवा कर्करोगाच्या पेशींनी बनवलेले इतर पदार्थ दिसू शकतात. रक्त चाचण्या तुमच्या डॉक्टरांना तुमचे अवयव किती चांगले कार्य करत आहेत आणि ते कर्करोगाने प्रभावित आहेत का याची कल्पना देखील देऊ शकतात.
कर्करोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्त चाचण्यांच्या उदाहरणांमध्ये संपूर्ण रक्तपेशी गणना परीक्षा (complete blood cell count / CBC, जी विविध प्रकारच्या रक्त पेशींचे प्रमाण मोजते, किंवा एखाद्या प्रकारच्या रक्त पेशी किंवा असामान्य पेशी खूप जास्त किंवा खूप कमी असल्यास त्यांची संख्या मोजते), अस्थिमज्जेची (bone marrow/BM) बायोप्सी, सीरम प्रोटीन चाचणी (जी तुमच्या शरीरातील कर्करोग पेशींद्वारे उत्पादित ट्यूमर मार्कर प्रथिने शोधते) या परीक्षणांचा समावेश आहे. सीरम ट्यूमर मार्करच्या उदाहरणांमध्ये प्रोस्टेट कर्करोगासाठी प्रोस्टेट-स्पेसिफिक ॲंटिजेन (PSA), गर्भाशयाच्या कर्करोगासाठी cancer antigen 125 (CA 125), मेड्युलरी थायरॉईड कर्करोगासाठी कॅल्सीटोनिन, यकृताच्या कर्करोगासाठी अल्फा-फीटोप्रोटीन (AFP) आणि टेस्टिक्युलर कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या जर्म सेल ट्यूमरसाठी ह्युमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन (HCG) यांचा समावेश होतो.
सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल चाचणी ( CTC test) म्हणजे काय?
मूळ कर्करोगाच्या ठिकाणापासून वेगळ्या झालेल्या ट्यूमर पेशी रक्तात तरंगू शकतात आणि फिरू शकतात (रक्तभ्रमित कर्कपेशी). अब्जावधी रक्तपेशींच्या पार्श्वभूमीवर शोध घेतल्यास रक्तभ्रमित कर्कपेशी (CTCs) अत्यंत दुर्मिळ असतात आणि शोधणे कठीण असते. म्हणून, कर्करोग तज्ञांना अत्यंत संवेदनशीलता आणि अचूकतेने CTC चाचणी वापरण्याचा प्रयत्न करावा लागतो. बहुतेक CTC चाचण्यांमध्ये दोन सामान्य वैशिष्ट्यांपैकी एकाचा वापर केला जातो: प्रामुख्याने कर्करोगाच्या पेशींच्या पृष्ठभागावरील प्रथिनांना पकडून ठेवतील असे रासायनिक गळ वापरले जातात किंवा रक्तपेशींच्या तुलनेत कर्करोगाच्या पेशींच्या थोड्या मोठ्या आकाराचा फायदा घेऊन चाळणी द्वारे CTC वेगळ्या केल्या जातात. परंतु हे समजून घेतले पाहिजे की यापैकी कोणतेही वैशिष्ट्य केवळ कर्करोगाच्या पेशींसाठी अद्वितीय नाही, ज्यामुळे चाचणीची अचूकता कमी होते. CTC चाचणी सामान्यतः कधीही एकट्याने वापरली जात नाही तर इतर निदान पद्धतींसह वापरली जाते.
कर्करोगाच्या प्रयोगशाळेतील चाचणीनंतर काय होते?
रक्त आणि लघवीच्या चाचण्या कर्करोगाचे निदान दर्शवू शकतात, परंतु निश्चित निदान करण्यासाठी बायोप्सीसारख्या इतर चाचण्या सहसा आवश्यक असतात. काही वेळा, ट्यूमर मार्करच्या पातळीचे अनेक महिने निरीक्षण केले जाते. तुमचा कर्करोग उपचारांना प्रतिसाद देत आहे की तो वाढत आहे हे निर्धारित करण्यासाठी देखील या चाचण्या उपयुक्त आहेत.
मेटॅस्टॅटिक (संक्रमित) कर्करोग म्हणजे काय?
मेटास्टॅसिस म्हणजे कर्करोग जिथे सुरू झाला तिथून दुसऱ्या शरीराच्या भागात पसरणे. जेव्हा हे घडते तेव्हा डॉक्टर म्हणतात की कर्करोग "मेटास्टेसाइज्ड" झाला आहे, किंवा "प्रगत" किंवा "स्टेज 4 कर्करोगापर्यंत पोहोचला आहे." (परंतु लक्षात ठेवा की हा 'प्रगत' कर्करोग कदाचित स्थानिक पातळीवर प्रगत असू शकतो, आणि त्याने आसपासच्या सामान्य ऊतींवर आक्रमण केले नसेल तर तो मेटास्टॅटिक नसू शकतो.) जेव्हा कर्करोगाच्या पेशी मुख्य ट्यूमरपासून वेगळ्या होतात आणि रक्तप्रवाहात किंवा लसीका द्रवपदार्थात (lymph/लिंफ मध्ये) प्रवेश करतात तेव्हा मेटास्टॅसेस विकसित होतात. रक्त वा लिंफ या आपल्या शरीरातील द्राव्य संयोजी ऊती शरीरात सर्वत्र साहित्य वाहून नेतात, त्याच प्रकारे कर्करोगाच्या पेशींनाही मूळ ट्यूमरपासून दूर शरीराच्या दुसऱ्या भागात वाहून नेऊ शकतात. स्थिर झाल्यावर या कर्कपेशी नवीन ट्यूमर तयार करू शकतात ( secondary tumor/ दुय्यम ट्यूमर). कधीकधी जेव्हा मुख्य ट्यूमरमधील कर्करोगाच्या पेशी, विशेषत: पोटाच्या भागात, फुटतात आणि कर्करोगाच्या अवयवाभोवती असलेल्या ॲसायटिस (ascites) या द्रवपदार्थात तरंगतात आणि यकृत, फुफ्फुसे किंवा हाडे यांसारख्या जवळच्या भागात वाढण्यासाठी प्रवास करतात, तेव्हा देखील मेटास्टॅसेस विकसित होऊ शकतात.
काही कर्करोग रुग्णांना निदान होतानाच मेटास्टॅटिक कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजेच त्यांचा कर्करोग प्रगतीच्या सुरुवातीच्या टप्प्यांपेक्षा पुढे गेला आहे. या रुग्णांमधील उपचार हे त्या अनुषंगाने अधिक आक्रमक आणि सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षा वेगळे असले पाहिजेत.
काही कर्करोग विशिष्ट ठिकाणी का पसरतात?
विशिष्ट अवयवांच्या कर्करोगाच्या पेशी शरीराच्या विशिष्ट भागातच नवे घर शोधण्याची प्रवृत्ती ठेवतात. उदाहरणार्थ, स्तनाचा कर्करोग हाडे, यकृत, फुफ्फुसे, छातीची भिंत आणि मेंदूमध्ये पसरतो; फुफ्फुसाचा कर्करोग मेंदू, हाडे, यकृत आणि अधिवृक्क ग्रंथींमध्ये पसरतो, तर प्रोस्टेट कर्करोग हाडांमध्ये पसरतो. त्याचप्रमाणे, मोठे आतडे (colon/कोलन) आणि गुदाशयाचे (colon) कर्करोग (colo-rectal cancer) यकृत आणि फुफ्फुसांमध्ये पसरतात. कर्करोगाच्या पेशींचे विशिष्ट द्वितीय ठिकाणी हे "घरी येणे" हे विशिष्ट रिसेप्टर प्रथिनांशी असलेल्या जैवरासायनिक आत्मीयतेमुळे होते असे मानले जाते. ज्या गंतव्य-स्थानाच्या अवयवातील पेशी त्यांच्या बाह्य पडद्यावर अशी विशिष्ट रिसेप्टर प्रथिने प्रदर्शित करतात त्या अवयवाकडे कर्करोगी पेशी आकृष्ट होतात.
मेटास्टॅटिक कर्करोगाचे नाव मूळ कर्करोगासारखेच असते का?
हो, दुसऱ्या भागात पसरलेल्या कर्करोगाला मूळ कर्करोगासारखेच नाव दिले जाते. उदाहरणार्थ, यकृतात पसरणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाला मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग म्हणतात, यकृताचा कर्करोग नाही. कारण कर्करोग स्तनात सुरू झाला होता आणि वापरलेला उपचार हा स्तनाच्या कर्करोगासाठी प्रभावी आहे.
डॉक्टर मेटास्टेसिसचा उपचार कसा करतात?
मेटास्टॅटिक कर्करोगाचा उपचार कर्करोगाच्या उत्पत्तीवर, कर्करोगाच्या प्रसाराच्या प्रमाणावर, तो कुठे आहे, रुग्णाचे वय आणि आरोग्य आणि उपचार पर्यायासाठी रुग्णाची वैयक्तिक पसंती यावर अवलंबून असतो. अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की मेटास्टॅसेस मूळ ट्यूमरपेक्षा रेण्वीय आणि अनुवांशिक पातळीवर वेगळे असू शकतात, म्हणून मेटास्टॅसिससाठी उपचार बहुतेकदा मूळ ट्यूमरसाठी वापरल्या जाणाऱ्या उपचारांपेक्षा वेगळे असतात. उपचार पर्याय सहसा रक्तातून दिले जाणारे म्हणजे सिस्टेमिक (systemic) असतात. म्हणून ते रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतात, आणि ते एकतर लक्ष्यवेधी (टारगेटेड/ targeted) थेरपी, केमोथेरपी, हॉर्मोन थेरपी किंवा इम्युनोथेरपी, या द्वारे एकटे किंवा एकत्रितपणे केले जातात. अर्थात, ट्यूमर प्राथमिक अवयवाच्या पलीकडे पसरला असल्याने, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी हे मर्यादित उपयुक्ततेचे पर्याय आहेत.
उपचाराने मेटास्टॅटिक कर्करोग बरा होतो का?
काही परिस्थितींमध्ये, मेटास्टॅटिक कर्करोग बरा होऊ शकतो, परंतु बहुतेक वेळा, तो उपचारांनी पूर्ण बरा होऊ शकत नाही. परंतु डॉक्टर त्याची वाढ मंद करू शकतात आणि लक्षणे कमी करू शकतात. मेटास्टॅटिक रोग विकसित झाल्यानंतरही, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांनंतर रुग्ण अनेक महिने किंवा वर्षे जगणे शक्य आहे.
रुग्ण किंवा नातेवाईकांनी उपचार करणाऱ्या ऑन्कोलॉजिस्टला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला विचारण्यासाठी योग्य प्रश्न पुढीलप्रमाणे असू शकतात:
१. माझ्या कर्करोगाचा प्रकार काय आहे?
२. कर्करोग किती दूर पसरला आहे आणि तो कुठे आहे?
३. कर्करोग किती प्रमाणात पसरला आहे?
४. कर्करोग लवकर वाढत आहे की हळूहळू?
५. माझ्या उपचारांचा प्रकार काय आहे?
६. कर्करोग उपचारांना कसा प्रतिसाद देईल?
७. उपचाराचे ध्येय काय आहे? (पूर्ण बरा होणे, ट्यूमरची वाढ मंदावणे किंवा वेदनांपासून लक्षणे कमी होणे?) [लक्षात ठेवा: कर्करोग कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून उपचारादरम्यान ही उद्दिष्टे बदलू शकतात.]
८. उपचारांचे अपेक्षित दुष्परिणाम कोणते आहेत? [वेदना, मळमळ, केस गळणे इ.]
९. मी उपचाराच्या दुष्परिणामांचे व्यवस्थापन कसे करू?
क्लिनिकल ट्रायल्स किंवा चाचण्या म्हणजे काय?
क्लिनिकल चाचण्यांमध्ये जे अद्याप व्यापक वापरासाठी मंजूर झालेले नाहीत आणि सामान्य लोकांसाठी अद्याप उपलब्ध नाहीत असे उपचार प्रायोगिक तत्त्वावर दिले जातात. सामान्यतः, क्लिनिकल चाचणी पर्याय कर्करोगाने ग्रस्त असलेल्या केवळ 3% ते 5% प्रौढांसाठी वापरला जातो. क्लिनिकल चाचणी मेटास्टॅसेससाठी मुख्य उपचार असू शकते, किंवा पर्यायांपैकी एक असू शकते. क्लिनिकल चाचणी उपचार वैयक्तिक रुग्णांना बरे होण्यास मदत करू शकतीच असे नाही, परंतु ते क्लिनिकल संशोधकांना जी मौल्यवान माहिती देतात ती भविष्यातील रुग्णांना मदत करू शकते. बहुतेक वेळा, नवीन कर्करोगविरोधी औषधे विकसित करणाऱ्या औषध कंपन्यांच्या सहकार्याने आघाडीचे कर्करोग तज्ञ क्लिनिकल चाचणी आयोजित करतात. कर्करोगाच्या हजारो क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तुमच्या कर्करोगाच्या प्रकारानुसार असे उपचार तुमच्यासाठी उपलब्ध असू शकतात.
मेटास्टॅटिक कर्करोगाने दीर्घकाळ जगल्यास त्याचा सामना कसा करावा?
जेव्हा तुम्ही कर्करोगासोबत अनेक महिने किंवा वर्षे जगता तेव्हा डॉक्टर बहुतेक वेळा त्या कर्करोगाला एक जुनाट किंवा दीर्घकालीन आजार मानतात; आणि रुग्णाने सतत उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोगासोबत जगण्याच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक परिणामांसाठी तुम्हाला मदतीची देखील आवश्यकता आहे. योग्य सहाय्यक संस्थेशी संबंध असणे खूप फायदेशीर ठरेल.
हाडांचे मेटास्टॅसिस म्हणजे काय?
कर्करोगाच्या पेशी त्यांच्या मूळ जागेपासून हाडांपर्यंत पसरतात तेव्हा हाडांमध्ये मेटास्टॅसिस होतो. जवळजवळ सर्व प्रकारचे कर्करोग हाडांमध्ये पसरू शकतात (हाडांमध्ये मेटास्टेसाइज होऊ शकतात). परंतु काही प्रकारचे कर्करोग विशेषतः हाडांमध्ये पसरण्याची शक्यता असते, ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग आणि प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग यांचा समावेश आहे. हाडांमधील मेटास्टॅसिस कोणत्याही हाडात होऊ शकते परंतु सामान्यतः पाठीचा कणा, माकडहाड (श्रोणि) आणि मांडीमध्ये होतो. हाडांतील वेदना ही हाडांमधील मेटास्टॅसिसची प्रथम सूचना असू शकते. अन्यथा, कर्करोगाच्या उपचारानंतर अनेक वर्षांनी हाडांमध्ये मेटास्टॅसिस होऊ शकतो. हाडांमध्ये मेटास्टॅसिसमुळे वेदना होऊन हाडे तुटू शकतात. सामान्यतः, हाडांमध्ये पसरलेला कर्करोग बरा होऊ शकत नाही. शामक (palliative / पॅलिएटिव्ह) उपचारांमुळे हाडांच्या मेटास्टॅसिसची वेदना आणि इतर लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
हाडांच्या मेटास्टॅसिसची चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?
हाडांच्या मेटास्टॅसिसची चिन्हे आणि लक्षणे म्हणजे हाडांमध्ये वेदना, हाडे तुटणे, मूत्रमार्गात असंयम, आतड्यांमध्ये असंयम, पाय किंवा हातांमध्ये कमकुवतपणा, रक्तातील कॅल्शियमचे उच्च प्रमाण (हायपरकॅल्सेमिया), ज्यामुळे मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता आणि वैचारिक गोंधळ हे परिणाम होऊ शकतात.
कोणत्या कर्करोगांमध्ये हाडांमध्ये मेटास्टॅसिस होण्याची प्रवृत्ती असते?
हाडांच्या मेटास्टॅसिसचा सर्वात जास्त धोका असलेल्या कर्करोगांमध्ये स्तनाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा, प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग आणि थायरॉईड कर्करोग यांचा समावेश आहे.
मेंदूतील मेटास्टेसिस म्हणजे काय?
कर्करोगाच्या पेशी त्यांच्या मूळ जागेपासून मेंदूपर्यंत पसरतात तेव्हा मेंदूतील मेटास्टॅसेस होतात. वाढत्या मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमरमुळे मेंदूच्या आसपासच्या ऊतींवर दबाव निर्माण होतो आणि त्यांचे कार्य बदलते. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी किंवा दोन्ही हे प्राथमिक उपचार पर्याय आहेत. काही रुग्णांना केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी उपयुक्त ठरू शकतात. उपचार बहुतेक वेळा उपशामक असतात, म्हणजे कर्करोगामुळे होणारी वेदना आणि लक्षणे कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
मेंदूतील मेटास्टेसिसची चिन्हे आणि लक्षणे कोणती आहेत?
मेंदूतील मेटास्टॅसेसची चिन्हे आणि लक्षणे म्हणजे डोकेदुखी, कधीकधी उलट्या किंवा मळमळ, मानसिक बदल, जसे की वाढत्या स्मरणशक्तीच्या समस्या, झटके आणि चक्कर येणे.
कोणत्या कर्करोगांमध्ये मेंदूमध्ये मेटास्टेसिस होण्याची प्रवृत्ती असते?
मेंदूच्या मेटास्टॅसिसचा सर्वात जास्त धोका असलेल्या कर्करोगांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग आणि मेलेनोमा यांचा समावेश आहे.
कर्करोगाच्या उपचारांमध्ये किती प्रकार आहेत?
कोणत्याही कर्करोगाच्या उपचारांचा वापर प्राथमिक उपचार म्हणून केला जाऊ शकतो, परंतु कर्करोगांसाठी सामान्यतः प्राथमिक कर्करोग उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. जर तुमचा कर्करोग रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपीसाठी विशेषतः संवेदनशील असेल, तर तुम्हाला त्यापैकी एक उपचार तुमचा प्राथमिक उपचार म्हणून मिळू शकेल.
कर्करोगांवर उपचार कसे केले जातात?
कर्करोगावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे अनेक पर्याय असतात. या पर्यायांमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लॅंट), इम्युनोथेरपी, हॉर्मोन थेरपी आणि लक्ष्यवेधी (टारगेटेड) थेरपी यांचा समावेश आहे.
निओ-अॅडजुव्हंट आणि अॅडजुव्हंट उपचारपद्धती काय आहेत?
निओ अॅडजुव्हंट थेरपी ही बरे करण्याच्या उद्देशाने शस्त्रक्रिया (क्युरेटिव्ह सर्जरी) किंवा क्युरेटिव्ह रेडिएशन थेरपीपूर्वी दिली जाणारी उपचारपद्धती आहे आणि ट्यूमरचा भार कमी करण्याच्या उद्देशाने ती दिली जाते. अॅडजुव्हंट थेरपी ही क्युरेटिव्ह शस्त्रक्रियेनंतर दिली जाणारी उपचारपद्धती आहे, जिथे कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता कमी करण्यासाठी, प्राथमिक उपचारानंतरही राहू शकणाऱ्या कोणत्याही कर्करोगाच्या पेशी मारणे हे उद्दिष्ट असते. कोणत्याही कर्करोगाच्या उपचारपद्धतीचा वापर अॅडजुव्हंट थेरपी म्हणून केला जाऊ शकतो. सामान्य अॅडजुव्हंट थेरपीमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोन थेरपी यांचा समावेश होतो.
उपशामक (पॅलिएटिव्ह) उपचार म्हणजे काय?
उपशामक उपचार म्हणजे उपचारांच्या लक्षणांचे आणि दुष्परिणामांचे वैद्यकीय व्यवस्थापन ज्यामुळे जीवनमान चांगले होते. यामुळे रुग्णांना मिळालेल्या उपचारांबद्दल अधिक समाधान वाटू शकते. शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी आणि हॉर्मोन थेरपी या सर्वांचा वापर वेदना दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. वेदना आणि धाप लागणे यांसारख्या लक्षणांपासून औषधांमुळे मुक्ती मिळू शकते. उपशामक उपचारांचा वापर कर्करोग बरा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर उपचारांसोबतच केला जाऊ शकतो.
कर्करोगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया कधी केली जाते?
शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट कर्करोग पूर्णपणे किंवा शक्य तितका काढून टाकणे आहे, आणि तिचा प्राथमिक हेतू कर्करोग बरा करणे हा आहे.
केमोथेरपी म्हणजे काय?
केमोथेरपी म्हणजे कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी रक्तवाहिन्यांतर्गत औषधांचा वापर.
रेडिएशन थेरपी म्हणजे काय?
रेडिएशन थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी एक्स-रे सारख्या उच्च-शक्तीच्या ऊर्जा किरणांचा वापर केला जातो. रेडिएशन उपचार तुमच्या शरीराबाहेरील मशीनमधून येऊ शकतात (बाह्य ऊर्जा किरण / एक्स्टर्नल बीम रेडिएशन) किंवा त्या ऊर्जेचा स्रोत तुमच्या शरीरात ठेवता येतो (ब्रॅकीथेरपी/brachytherapy).
अस्थिमज्जा प्रत्यारोपण (bone marrow transplant) म्हणजे काय?
अस्थिमज्जा प्रत्यारोपणाला स्टेम सेल ट्रान्सप्लांट असेही म्हणतात. तुमची अस्थिमज्जा हा तुमच्या हाडांमधील रक्तपेशी बनवणारा पदार्थ आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी तुमच्या स्वतःच्या पेशी किंवा सुयोग्य दात्याच्या पेशी वापरल्या जाऊ शकतात. अस्थिमज्जा प्रत्यारोपणामुळे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केमोथेरपीच्या उच्च डोस वापरण्याची मुभा मिळते. आजारी अस्थिमज्जा बदलण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
इम्युनोथेरपी म्हणजे काय?
इम्युनोथेरपी (ज्याला बायोलॉजिकल थेरपी असेही म्हणतात) मध्ये तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर कर्करोगाशी लढण्यासाठी केला जातो. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगी पेशींना घुसखोर म्हणून ओळखत नसल्यामुळे कर्करोग तुमच्या शरीरात अनियंत्रितपणे टिकून राहू शकतो. इम्युनोथेरपी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगी पेशींमध्ये "कर्करोग पाहण्यास" आणि त्यावर हल्ला करण्यास मदत करू शकते.
हॉर्मोन थेरपी म्हणजे काय?
काही प्रकारचे कर्करोग तुमच्या शरीरातील संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स च्या) अतिरेकामुळे होतात. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग. हॉर्मोन थेरपी द्वारे शरीरातून ते संप्रेरक काढून टाकल्याने किंवा त्यांचे परिणाम रोखल्याने कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबू शकते.
लक्ष्यवेधी औषधोपचार म्हणजे काय?
विशिष्ट रेण्वीय विकृतींमुळे कर्करोगी पेशींना अनिर्बंध जगता येते. लक्ष्यवेधी (टारगेटेड) औषधोपचार कर्करोगाच्या पेशींमधील अशा विशिष्ट रेण्वीय विकृतींवर लक्ष केंद्रित करतात आणि त्या रेणूंना लक्ष्य करून कर्करोगी पेशींचा नाश केला जातो.
क्लिनिकल ट्रायल्स किंवा चाचण्या म्हणजे काय?
क्लिनिकल चाचण्या म्हणजे कर्करोगाच्या उपचारांच्या नवीन पद्धतींचा शोध घेण्यासाठी केलेले अभ्यास. हजारो कर्करोगाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तुमच्या कर्करोगाच्या प्रकारानुसार इतर उपचार तुमच्यासाठी उपलब्ध असू शकतात.
कर्करोगाचे आणि कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम काय आहेत?
कर्करोग आणि त्याच्या उपचारांमुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यात खालील त्रास समाविष्ट आहेत:
वेदना:वेदना कर्करोगामुळे किंवा कर्करोगाच्या उपचारांमुळे होऊ शकतात, अर्थातच, सर्व कर्करोग वेदनादायक नसतात. औषधे आणि इतर पद्धती कर्करोगाशी संबंधित वेदनांवर प्रभावीपणे उपचार करू शकतात.
थकवाकर्करोग असलेल्या लोकांमध्ये थकवा येण्याची अनेक कारणे असतात, परंतु असा थकवा बरेचदा आटोक्यात आणता येतो. केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी उपचारांशी संबंधित थकवा सामान्य आहे, परंतु तो सहसा तात्पुरता असतो.
श्वास घेण्यास त्रास:कर्करोग किंवा कर्करोगाच्या उपचारांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. उपचारांमुळे आराम मिळू शकतो.
मळमळ:काही कर्करोग आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे मळमळ होऊ शकते. कधीकधी तुमचे डॉक्टर तुमच्या उपचारांमुळे मळमळ होण्याची शक्यता आहे की नाही हे आधीच सांगू शकतात. औषधे आणि इतर उपचारांमुळे मळमळ टाळता येते किंवा कमी करता येते.
अतिसार किंवा बद्धकोष्ठता:कर्करोग आणि कर्करोगावरील उपचार तुमच्या आतड्यांच्या सवयींवर परिणाम करू शकतात आणि अतिसार किंवा बद्धकोष्ठता निर्माण करू शकतात.
वजन कमी होणे:कर्करोग आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे वजन कमी होऊ शकते. कर्करोग सामान्य पेशींमधून अन्न चोरतो आणि त्यांना पोषक तत्वांपासून वंचित ठेवतो. हे बहुतेक वेळा किती कॅलरीज किंवा कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते यावर अवलंबून नसते; त्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण असते. बहुतेक रुग्णांमध्ये, पोटात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये नळ्यांद्वारे कृत्रिम पोषण वापरणे वगैरे उपायांनंतरही वजन कमी होणे थांबत नाही.
तुमच्या शरीरातील रासायनिक बदल:कर्करोग तुमच्या शरीरातील सामान्य रासायनिक संतुलन बिघडवू शकतो आणि गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढवू शकतो. रासायनिक असंतुलनाची चिन्हे आणि लक्षणे असलेल्या जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, बद्धकोष्ठता आणि वैचारिक गोंधळ या लक्षणांकडे बारकाईने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मेंदू आणि मज्जासंस्थेच्या समस्या:कर्करोग जवळच्या नसांवर दाब देऊ शकतो आणि तुमच्या शरीराच्या एका भागाचे कार्य आणि वेदना कमी करू शकतो. मेंदूला होणारा कर्करोग डोकेदुखी आणि स्ट्रोकसारखी लक्षणे आणि तुमच्या शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा वगैरे लक्षणे निर्माण करू शकतो.
कर्करोगाबाबत असामान्य रोगप्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया:काही प्रकरणांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी पेशींवर हल्ला करून कर्करोगाच्या उपस्थितीवर अतिरेकी तीव्र प्रतिक्रिया देऊ शकते. पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम नावाच्या या अत्यंत दुर्मिळ प्रतिक्रियांमुळे चालण्यात अडचण येणे आणि झटके येणे यासारखी विविध चिन्हे आणि लक्षणे उद्भवू शकतात.
उपचारानंतर कर्करोग परत येतो तेव्हा काय होते?
कर्करोगातून वाचलेल्यांना कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका असतो. इतर कर्करोगांपेक्षा काही कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते. कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा. उपचारानंतर तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी नियतकालीन काळजीची योजना (फॉलो-अप केअर प्लॅन) तयार करू शकतात. या नियोजनात कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा शोध घेण्यासाठी तुमच्या उपचारानंतर ठराविक महिन्यांत आणि वर्षांमध्ये नियतकालिक स्कॅन आणि चाचण्यांचा समावेश असू शकतो.
कोणते घटक वैद्यकीय परिणाम निश्चित करतात?
वैद्यकीय परिणाम विविध घटकांच्या जटिल परस्पर-संवादाद्वारे निश्चित केला जातो. या परिणामांमध्ये खालील घटकांचा समावेश आहे: १) रुग्ण-संबंधित (वय, सह-रोग, अनुवांशिक पूर्वस्थिती, जीवनशैली), २) रोग-संबंधित (रोगाचा प्रकार आणि टप्पा, कर्करोगाची जैविक स्थिती, रोगाची प्रगती), ३) उपचार-संबंधित (उपचार प्रकार आणि तीव्रता, उपचारांचे पालन, उपचारांचा वेळ), ४) आरोग्य सेवा प्रणाली-संबंधित (काळजीची उपलब्धता, काळजीची गुणवत्ता, आरोग्य सेवा प्रदात्याचा अनुभव) आणि ५) पर्यावरणीय आणि सामाजिक घटक (सामाजिक-आर्थिक स्थिती, पर्यावरणीय घटक, सामाजिक आधार).
एपिडेमीऑलॉजी (कर्करोगाच्या उद्भवाचा अभ्यास) म्हणजे काय?
एपिडेमीऑलॉजी म्हणजे कर्करोगाचा उद्गम, त्यांचे विविध भौगोलिक स्थानांत वितरण, कर्करोगाचे प्रकार आणि कर्करोगाशी संबंधित वैशिष्ट्यांचा लोकसंख्या-स्तरीय अभ्यास.
कॅन्सर प्रोग्नॉसिस (कर्करोगाची निष्पत्ती) म्हणजे काय?
प्रोग्नॉसिस हा एक वैद्यकीय शब्द आहे जो कर्करोगाचा भविष्यातील अंदाजित परिणाम किंवा त्याच्या मार्गक्रमणाचा संदर्भ देतो. रुग्णाच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांवर, वैद्यकीय इतिहासावर आणि त्याच्या स्थितीच्या तीव्रतेवर आधारित असा त्याच्या व्याधीची संभाव्य प्रगती, परिणाम आणि संभाव्य गुंतागुंतीचा अंदाज बांधता येतो. रोगनिष्पत्ती "चांगली" (बरे होण्याची उच्च शक्यता असलेले अनुकूल परिणाम), "खराब" (कर्करोग बरे होण्याची किंवा यशस्वी व्यवस्थापनाची कमी शक्यता असलेले प्रतिकूल परिणाम) किंवा "अंतिम स्थितीतील" (कर्करोग असाध्य आहे आणि आयुर्मान मर्यादित आहे) यांपैकी एक असू शकते. रोगनिष्पत्ती आरोग्यसेवा संस्थांसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास, उपचार नियोजन करण्यास, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भावनिक तयारी करण्यास आणि संसाधनांचे नियोजन करण्यास मदत करू शकते.
कर्करोग पूर्वपरीक्षणांसाठी मार्गदर्शक तत्वे
कर्करोग पूर्वपरीक्षण चाचण्यांचे (स्क्रीनिंग चे) तपशील खाली दिले आहेत: are given below:
महिलांसाठी कर्करोग पूर्वपरीक्षणे
वयोगट २१-२९: गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगासाठी वयाच्या २५ व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी किंवा दर पाच वर्षांनी एचपीव्ही चाचणी
स्तनाच्या कर्करोगासाठी वयाच्या २५ व्या वर्षापासून दर एक ते तीन वर्षांनी एक वैद्यकीय स्तन तपासणी.
वयोगट ३०-३९: गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगासाठी दर पाच वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट
स्तनाच्या कर्करोगासाठी दर एक ते तीन वर्षांनी स्तनाची वैद्यकीय तपासणी
वय ४५ आणि त्याहून अधिक: गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगासाठी दर पाच वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट
स्तनाच्या कर्करोगासाठी दरवर्षी मॅमोग्राम आणि स्तनाची वैद्यकीय तपासणी
वय ४५ आणि त्याहून अधिक: गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगासाठी दर पाच वर्षांनी पॅप स्मिअर टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट
स्तनाच्या कर्करोगासाठी दरवर्षी मॅमोग्राम आणि स्तनाची वैद्यकीय तपासणी
पुरुषांसाठी कर्करोग पूर्वपरीक्षणे
वयोगट ४५-७४:
प्रॉस्टेट कर्करोग: जर कुटुंबात कर्करोगाच्या इतिहासामुळे तुम्हाला धोका असेल, तर वयाच्या ४५ व्या वर्षापासून बेसलाइन पीएसए चाचणी आणि बेसलाइन डिजिटल रेक्टल तपासणीसह प्रॉस्टेट कर्करोग तपासणी करण्याचा विचार करा.
कोलोरेक्टल कर्करोग: वयाच्या ४५ व्या वर्षापासून दर १० वर्षांनी कोलोनोस्कोपी करा किंवा वयाच्या ४५ व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी मलाधारित डीएनए चाचणी करा.
वय ७५ आणि त्याहून अधिक: तुमच्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यास, प्रॉस्टेट आणि कोलोरेक्टल कर्करोगाची तपासणी सुरू ठेवा. वयाच्या ८५ नंतर कोलोरेक्टल कर्करोगाची तपासणी करण्याची शिफारस केलेली नाही.
